कुरखेडा येथील रेती तस्करीत नागपूरचे गुंड सक्रिय? सती नदी पात्रातून उपसा

मुजोर तस्करांची गस्ती पथकाला दमदाटी !

कुरखेडा : येथील सती नदीपात्रातून रेती तस्करीला ऊत आला आहे. नागपूर येथील काही गुंड प्रवृत्तीचे लोक या रेती तस्करीत सक्रिय असून त्यांनी दोन वेळा येथील गस्ती पथकाच्या वाहनाला अडवून कर्तव्यावर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात पथकातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनही दिले. मात्र रेती तस्करांच्या मुजोरीपुढे गस्ती पथक हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

सध्या खासगी आणि सरकारी बांधकामासाठी लागणारी रेती अवैध मार्गाने उपसा करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. अवैध रेती उपसा नियंत्रित करण्यासाठी तहसीलदार रमेश कुंभारे यांच्या मार्गदर्शनात गठीत केलेले गस्ती पथक कागदावरच आहे. रेती तस्करांकडून दोन वेळा सरकारी गाडी अडवून दमदाटी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत वरिष्ठांकडे रितसर तक्रारही करण्यात आली, पण तस्करांना रोखण्यात अपयश आल्याने आता कोणी गस्तीवर जाण्यास तयार होत नसल्याचे बोलले जात आहे.

कुरखेडा परिसरात सध्या कोणत्याही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. बांधकामाच्या ठिकाणी रेतीचे ढिगारे नजरेस पडतात. सामान्य लोकांना दिसणारे हे अवैध रेतीचे ढिग महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक महसूल, वन आणि पोलिस विभागाचे हात कोणी बांधले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

नक्षलप्रभावित क्षेत्र असल्याने संध्याकाळी सात वाजतानंतर पोलिस कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने कुरखेडा येथे सुरू असलेल्या अवैध रेतीला लगाम घालण्यात अडचण जात असल्याची खंत महसूल विभागाचे स्थानिक अधिकारी व्यक्त करतात. यासंदर्भात तहसीलदार कुंभारे यांना विचारणा करण्यासाठी मोबाईलवर संपर्क केला, मात्र त्यांनी कॅालला प्रतिसाद दिला नाही.