गळफास प्रकरणातील प्रेयसीनेही अखेर उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

मोबाईलमधील माहिती ठरणार महत्वपूर्ण

आरमोरी : एकाचवेळी गळफास घेऊन सोबतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन प्रेमी युगुलातील प्रेयसीनेही अखेर मृत्यूला कवटाळत अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन दिवसांपासून तिच्यावर ब्रह्मपुरीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण ती शुद्धीवर आलेली नव्हती. तिची कमी झालेली आॅक्सिजन लेवल वाढलीच नाही. अखेर शनिवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणातील प्रियकर राहुल गजानन सावसाकडे (20 वर्ष) याचा गळफास घेतल्याक्षणीच मृत्यू झाला होता. मात्र त्याच्या प्रेयसीला अर्धवट गळफास लागल्याने ती बेशुद्धावस्थेत होती. तिला वैद्यकीय उपचार देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न झाला, पण तिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही.

‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’ या भावनेतून त्यांनी सोबतच आत्महत्येचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. मात्र त्यांचे खरोखरच प्रेमप्रकरण होते का, असेल तर ते कधीपासून सुरू होते, त्यांनी आत्महत्येचा निर्णय कशामुळे घेतला, या घटनेमागे काही घातपात तर नाही ना, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे.

दोघांच्याही मोबाईलमधील डेटा, कॅाल डिटेल्स यावरून या प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. याशिवाय ज्या मित्राच्या खोलीवर ही घटना घडली त्या मित्रासह दोघांनाही दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या त्यांच्या मित्रांकडील माहितीही महत्वपूर्ण ठरणार आहे.