112 गावे दोन महिन्यांसाठी, तर 67 गावे दोन आठवड्यांपर्यंत संपर्काबाहेर जाणार

'आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज राहा'

गडचिरोली : पावसाळ्यात जिल्ह्यातील 112 गावे दोन महिन्यांसाठी, तर 67 गावे दोन आठवड्यांपर्यंत वाहतुकीने संपर्कात नसतात. त्यामुळे त्या गावांमध्ये वैद्यकीय सुविधांसोबत अन्नधान्य पुरविण्याची सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केली. याशिवाय इतर जिल्ह्यातील धरणांच्या विसर्गामुळे पाणी नदीद्वारे जिल्ह्यात येवून पूर परिस्थिती उद्भवू शकते. यामुळे मान्सून कालावधीत कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने 24 तास सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, आदित्य जीवने, श्रीमती मानसी, अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते.

जिल्ह्यातील वाहतुकीने संपर्काबाहेर जाणाऱ्या गावांमध्ये किमान चार महिन्यांचे रेशन आणि औषधीसाठा तातडीने उपलब्ध करावा, सदर धान्यसाठा पोहोचला की नाही याची खात्री करावी. यासोबतच या गावातील पुढील चार महिन्यात प्रसुतीची तारीख असलेल्या गर्भवती महिलांना इतर जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी, तसेच त्यांच्या सोबतच्या महिला व बालकांना देखील रिक्त वॅार्डात राहण्याची जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी केल्या.

आपल्या भागातील जेसीबी चालक, पोकलँन्ड, खोल पाण्यात पोहणारे तैराक, बचाव पथकातील तरुण यांची यादी तयार ठेवावी. वेळोवेळी तुटलेली झाडे उचलणे, मलबा हटवणे, गावखेड्यातील नदीनाल्यांवरील छोटे पूल दुरुस्त करून घेणे, पाणी सुरळीत जाण्यासाठी त्यांची साफसफाई करणे, यात्रेच्या ठिकाणी रस्ते मोकळे राहतील व अतिक्रमण होणार नाही याबाबत दक्षता घेणे, धोकादायक म्हणून प्रमाणित केलेल्या इमारती, तसेच बंद व वापरात नसलेल्या जुन्या शासकीय इमारती तातडीने पाडाव्यात. साप चावल्यानंतर द्यावयाची औषधी सामुदायिक आरोग्य केंद्रात उपलब्ध ठेवावी, ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता तसेच नालेसफाई करून घ्यावी. हॅन्डपंप, विहीरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकावे, पिण्याच्या पाण्याजवळ सांडपाण्याचे डबके साचू नये व असल्यास तातडीने त्यावर उपाययोजना करण्यास जिल्हाधिकारी दैने यांनी सांगितले.

मान्सून कालावधीत तहसीलदारांच्या परवानगीशिवाय पाण्यात बोट, होडी, डोंगा नेता येणार नाही. रस्त्यावरून, पुलावरून पुराचे पाणी जात असताना गाडी टाकू नये. मेंदूज्वर, मलेरिया, गॅस्ट्रो आदी दूषित पाणी व डासांमुळे होणारे रोग टाळण्यासाठी गावागावात बैठक घेऊन स्वच्छता ठेवण्याबाबत जनजागृती करावी. वीज पडून जीवित हाणी होऊ नये यासाठी जिल्ह्यात वीज प्रतिरोधक यंत्रणा मोठ्या प्रमाणात उभारण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच वीजा कडाडत असताना झाडाखाली आसरा न घेण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीला सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, सिंचन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, विद्युत विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अवैध होर्डिंगवर कारवाई करा

मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध होर्डिंगबाबत नगर परिषदेने काय कारवाई केली, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली. शासकीय कार्यालयाच्या परिक्षेत्रात शासकीय होर्डिंगशिवाय दुसरे कोणतेही होर्डिंग असू नये. आपल्या हद्दीतील अवैध होर्डिंग तातडीने काढावे. दुर्घटना घडल्यास संबंधित परीक्षेत्रातील अधिकाऱ्याला यासाठी जबाबदार ठरवून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.