गडचिरोली : आठ वर्षांपूर्वी अहेरी दलममध्ये भरती झालेल्या आणि सध्या भामरागड दलममध्ये कार्यरत असलेल्या महिला माओवादीने गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकापुढे आत्मसमर्पण केले. 2 डिसेंबरपासून नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू झाला. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांना हे यश मिळाले आहे.
तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे (28 वर्ष) असे त्या आत्मसमर्पित नक्षलीचे नाव आहे. ती अहेरी तालुक्यातील नैनेर या गावची रहिवासी आहे. तिच्यावर खुनाचे 3 तर चकमकीचे 8 गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर 2 लाखांचे इनाम ठेवले होते.
तारा ही सन 2016 मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली होती. त्यानंतर 2018 पासून ती भामरागड दलममध्ये कार्यरत होती. सन-2016 मध्ये कवठाराम जंगल परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. 2017 मध्ये शेडा-किष्टापूर जंगल परिसरात झालेली चकमक, 2017 मध्ये आशा-नैनेर जंगल परिसरातील चकमक, 2019 मध्ये मोरमेट्टा जंगल परिसरातील चकमक, 2020 मध्ये आलदंडी जंगल परिसरातील चकमक, 2020 मध्ये येरदळमी जंगल परिसरातील चकमक, 2021 मध्ये काकुर माड एरिया (छ.ग.) परिसरातील चकमक, 2023 मध्ये हिक्केरच्या जंगलातील चकमकीत तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
तारा हिचा 2021 मध्ये कोठी येथील एका निरपराध इसमाच्या खुनामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता, तसेच 2023 मध्ये मिळदापल्ली येथील एका निरपराध इसमाचा खून आणि 2024 मध्ये ताडगाव येथील एका निरपराध इसमाच्या खुनामध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. याशिवाय 2022 मध्ये कापेवंचा राजाराम (खां) येथील दरोड्यात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
नक्षल दलममधील अहोरात्र भटकंतीचे जीवन असल्यामुळे, आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नसल्याने वरीष्ठ माओवादी नेते गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेत असल्याने कंटाळून आत्मसमर्पण केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.