पोलीस हवालदारानेच केले लैंगिक शोषण, गडचिरोलीत गुन्हा दाखल

अल्पवयीन युवतीने सांगितली आपबिती

गडचिरोली : येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका हवालदाराने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीवरून त्या हवालदारावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बंडू गेडाम (52 वर्ष) असे त्या हवालदाराचे नाव आहे.

पीडित मुलीने सोमवारी आपली आपबिती गडचिरोली पोलिसांकडे सांगितल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अजय जगताप, पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी तिचे बयान घेऊन हवालदार गेडाम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मात्र ज्यांच्याकडून संरक्षणाची अपेक्षा करायची त्या पोलिसानेच कुंपनाने शेत खाल्ल्याचा प्रकार केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.