वृत्त विश्लेषण / मनोज ताजने
गडचिरोली : एक विवाहित महिला, पती आणि दोन मुले असताना तिचे दुसऱ्या युवकाशी सुत जुळते. हे कमी म्हणून की काय, तिसराही तिच्या जीवनात येतो. स्वत:ची पत्नी, मुलांशी प्रतारणा करत ते दोन विवाहित प्रियकर तिच्या प्रेमात वाहावत जातात. अखेर या अनैतिक प्रेमाच्या त्रिकोणातून एकाला जीव गमवावा लागतो, तर दोघांना जेलची हवा खावी लागते. दक्षिण गडचिरोलीतील वर्दळीच्या आलापल्लीत घडलेली ही घटना धक्कादायक, तेवढीच समाजाला जागरूक होण्यासाठी प्रवृत्त करणारी आहे. प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या अशा अनैतिक गोष्टींचा अंत काय असतो हे या घटनेने दाखवून दिले. पण त्या तिघांच्याही निष्पाप मुलाबाळांवर या घटनेचा काय परिणाम होणार, हा विचार मनाला सुन्न केल्याशिवाय राहात नाही.
कुटुंबिय, जवळच्या लोकांनी का आवरले नाही?
या घटनेतील आरोपी महिलेसोबत मृत राकेश याचे नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते असे सांगितले जाते. एका विवाहित महिलेचे इतके वर्षपर्यंत परपुरूषासोबत प्रेमाचे संबंध असताना ही बाब त्या महिलेच्या कुटुंबियांना माहित नव्हती का? असेल तर त्यांनी तिला यापासून रोखले का नाही? एवढेच नाही तर सामाजिक भान ठेवून जवळच्या नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनीही याबद्दल तिला कधी टोकले नाही का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. अशा घटनांचा परिणाम समाजावर, भावी पिढीवरही पडत असतो. त्यामुळे ‘ते काय करतात याचे आपल्याला काय घेणे-देणे’ असा विचार करून शेजारीपाजारी किंवा नातेवाईकांनी दुर्लक्ष करणे सामाजिक वातावरण नासवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्या महिलेच्या वागणुकीकडे जवळच्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच तीने एका विवाहित पुरूषानंतर दुसऱ्या एका विवाहित पुरूषाचे घर नासवले. पण तिच्या वागणुकीला कोणीतरी वेळीच आवर घातला असता तर कदाचित तिच्यावर सामाजिक दडपण राहिले असते आणि पुढील कहाणीला ब्रेक लागला असता.
याला प्रेम कसे म्हणायचे?
प्रेमाला वय, वेळ, काळ, समाज असे कोणतेही बंधन नसते. प्रेम ही भावना मुळात पवित्रच आहे. त्यात स्वत:च्या सुखापेक्षा ज्या व्यक्तिवर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार केला जातो. पण आलापल्लीतील या घटनेत दोन विवाहित पुरूष आणि एक विवाहित महिला यांच्यातील भावनिक गुंतागुंत म्हणजे प्रेम होते की प्रेमाच्या नावाखाली चाललेला वासनेचा खेळ होता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या महिलेचे राकेशवर किंवा राकेशचे तिच्यावर प्रेम होते असे एकदाचे मान्य केले तरी ९ वर्षांपासून राकेशसोबत असलेले संबंध दूर सारून तिने आणखी एका विवाहित युवकाला, अर्थात सचिनला गळाला लावण्यामागचे कारण काय? पती हयात असताना दोन विवाहित परपुरूषांचे प्रेम मिळवणे इतकी प्रेमाची भूक तीव्र असू शकते का? अशा अनैतिक प्रेमाला समाजमान्यता नसताना अशा पद्धतीने वागण्याची हिंमत कोणी करणे, म्हणजे त्यात गुंतलेल्या व्यक्तींसोबत त्यांना रोखण्यात अपयशी ठरलेला समाजही त्यासाठी दोषी ठरतो, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
आमचे आई, बाबा जेलमध्ये…
या अनैतिक प्रेमाच्या त्रिकोणात तीनही कुटुंबाची वाताहात होणार आहे. त्यांनी केलेल्या कर्माची शिक्षा अप्रत्यक्षरित्या त्या दोघांच्या पत्नी आणि मुलांना, तसेच त्या महिलेच्या पती आणि तिच्या मुलांना भोगावी लागणार आहे. ज्या वयात मुलांना चांगले संस्कार देऊन भविष्यातील चांगली व्यक्ती घडवायची असते त्या वयात मुलांना आई किंवा बाबांच्या अनैतिक कृत्यांच्या कहाण्या एेकाव्या लागणार आहेत. आयुष्यातील पहिले गुरू म्हणून ज्या आई-बाबांकडे पाहिले जाते त्यांनी आपल्या वागणुकीतून स्वत:च्या मुलांना दिलेली शिकवण त्या बालमनावर खोल परिणाम करणार आहे. अशा अनैतिक प्रकारांना समाजाने वेळीच आवर घातला नाही तर उद्या हे प्रकार वाढीस लागतील. ‘त्यांच्या घरात काय चालले याकडे मी कशाला लक्ष देऊ?’ असे म्हणून दुर्लक्ष केल्यास कोणावर सामाजिक दडपणच राहणार नाही आणि उद्या कोणाच्याही घरात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.