काम करून देण्यासाठी कोणी तुम्हाला पैसे मागतो? मग ‘एसीबी’ला कळवा

भ्रष्टाचारमुक्तीसाठी दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात

गडचिरोली : भ्रष्टाचारमुक्त भारत-विकसित भारत ही संकल्पना घेवून ३० ऑक्टोबरपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात करण्यात आली. या अनुषंगाने अॅन्टी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) गडचिरोली कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.

हा दक्षता जनजागृती सप्ताह ५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा’ ही संकल्पना घेवून विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करुन सर्वसामान्य नागरीकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. शासकीय लोकसेवक व त्यांच्या कुटूंबियांकरीता भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात चर्चासत्रे, व्याख्यान, कार्यशाळा तसेच विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन या सप्ताहात केले जाणार आहे.

शहरी व तालुका क्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची घोषवाक्ये असलेली पत्रके, भित्तीपत्रके, बॅनर व पोस्टर वितरीत करुन भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामसभेचे आयोजन करुन वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार जनजागृतीसंबंधी व्याख्यान ठेवण्यात आले आहे.

सप्ताहादरम्यान सर्व शासकीय कार्यालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शासकीय मानधन घेणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व इतर लोकसेवकांच्या भ्रष्टाचारासंबंधी आणि त्यांनी अवैध मार्गाने जमविलेल्या मालमत्तेबाबत, तसेच एखाद्या कामाकरीता गैरमार्गाने पैशाची मागणी करीत असल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क करावा. तसेच पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय गडचिरोली येथील दूरध्वनी क्रमांक ०७१३२/२९५०२० वर कळवावे किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येवून तकार करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांनी केले आहे.

एसीबी कार्यालयात घेण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमास पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोनि शिवाजी राठोड, उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार, पोहवा नथ्थु धोटे, पोहवा राजू पदमगिरीवार, पोना स्वप्निल बांबोळे, किशोर जौंजाळकर, पोशि किशोर ठाकुर, संदीप उडान, संदीप घोरमोडे, पोशि विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना बसाके, चापोना प्रफुल डोर्लीकर इत्यादी उपस्थित होते.