अहेरी : आलापल्लीच्या श्रमिकनगरातील राकेश फुलचंद कन्नाके (३५ वर्ष) या विवाहित तरुणाच्या हत्येचा २४ तासात उलगडा करण्यात अहेरी पोलिसांना यश आले. या प्रकरणात आलापल्लीतील एका विवाहित महिलेसह तिचा प्रियकर सचिन मिसाळ याला पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी ताब्यात घेतले. लाकडी दांड्याने वार करून राकेशची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी दोन्ही संशयित आरोपींना मंगळवारी न्यायालयात उभे करून त्यांचा पीसीआर घेतल्या जाणार आहे.
हे हत्याकांड अनैतिक संबंधातूनच झाले हे स्पष्ट आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या माहिलेचे आरोपी सचिन आणि मृत राकेश या दोघांसोबतही प्रेमाचे संबंध होते. विशेष म्हणजे ती महिला विवाहित आहे. आरोपी सचिन हा दारू विक्रीच्या व्यवसायातही गुंतलेला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तो पैशाने गब्बर आहे. दुसरीकडे राकेशचा मिळकतीसाठी ठोस असा व्यवसाय नव्हता. त्यामुळे ती महिला आपल्यापेक्षा सचिनला जास्त भाव देते या रागातून त्याचे विवाहितेसोबत नेहमी खटके उडत होते. अशातच शनिवारच्या रात्री ती सचिनकडे गेल्याचे कळल्यानंतर राकेश याने सचिनचे घर गाठले. त्या ठिकाणी दोघांमध्ये भांडण झाले. याचवेळी झालेल्या झटापटीत राकेश हा घरालगतच्या नालीत पडला होता असेही सांगितले जात आहे. यादरम्यान आरोपी सचिन याने राकेशवर लाकडी दांड्याने प्रहार केले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आपल्यावर आळ येऊन नये म्हणून सचिनने राकेशला गोंडमोहल्ल्यातील मोकळ्या जागेत आणून टाकले.
अहेरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तातडीने तपासचक्रे फिरवून अवघ्या एक दिवसात आरोपींचा माग काढून त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.