गडचिरोली : छत्तीसगड सीमेकडील अतिसंवेदनशिल कवंडे गावात नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन करताच पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियानाला गती दिली आहे. त्या परिसरात माओवाद्यांनी उभारलेली चार स्मारकं पोलिसांनी उद्ध्वस्त केली. नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि परिसरात आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी माओवाद्यांकडून अशा प्रकारच्या स्मारकांची निर्मिती केली जाते.
बॅाम्ब शोधक व नाशक पथकांमार्फत तपासणी करून त्यात काही स्फोटक पदार्थ पेरले नाहीत ना, याची खात्री केल्यानंतर पोलिसांनी ती सर्व स्मारकं तोडून टाकली. मिडदापल्ली ते कवंडे रस्त्यावर माओवाद्यांनी ती स्मारके उभारली होती.
विकासापासून दूर असलेल्या भागाचा विकास साधता यावा आणि माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि.9 मार्च रोजी उपविभाग भामरागडअंतर्गत मौजा कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना केली आहे. सदर ठाण्याच्या उभारणीदरम्यान मिडदापल्ली ते कवंडे रस्त्यावर माओवाद्यांनी स्मारके बांधलेली असल्याचे पोलीस दलाच्या निदर्शनास आले होते. विशेष अभियान पथकातील जवानांनी ती सर्व स्मारके उद्ध्वस्त केली.
या भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केले असून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. यासोबतच अशा माओवाद्यांच्या स्मारकाला समाजात कुठेच स्थान नाही. त्यामुळे कोणीही अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम.व्ही.सत्यसाई कार्तिक, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.