कुरखेडा : कुरखेडा ते देसाईगंज मार्गावरील गेवर्धा वनक्षेत्रात सध्या एका नवतरुण वाघिणीने दहशत निर्माण केली आहे. आपल्या आईपासून वेगळी होऊन स्वत:चे कार्यक्षेत्र निश्चित करत असलेली ही नवतरुण वाघिण अवघी दिड वर्षाची आहे. विशेष म्हणजे ती बिनधास्तपणे रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावरून मुक्तसंचार करताना, रस्ता ओलांडताना दिसल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांसह गेवर्धा परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
कुरखेडा ते देसाईगंज मार्गावर मुक्तसंचार करणाऱ्या वाघिणीचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. त्यातील तिच्या डरकाळ्यांनी धडकी भरल्याशिवाय राहात नाही. एका चारचाकी वाहनधारकाने तो प्रसंग कॅमेरात कैद केला. वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशात ती वाघिण स्पष्टपणे दिसते.
काही महिन्यांपूर्वीपर्यंत वाघिणीसह तिचे बछडेही सोबत होते. पण आता बछडे मोठे झाल्यानंतर ते आईपासून वेगळे होऊन आपले स्वतंत्र अस्तित्व शोधत आहेत. आपले कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी ते वेगवेगळ्या भागातील जंगलात फिरत आहेत. त्यामुळे त्या भागात प्राण्यांच्या शिकारी वाढण्याची शक्यता आहे. प्रसंगी मनुष्यहाणीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या ज्या भागात या वाघांचे अस्तित्व आहे त्या भागातील नागरिकांनी जंगलात किंवा जंगलाशेजारील शेतात जाताना योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.