पत्नी आणि तिचा प्रियकरच निघाला लखनचा मारेकरी, धक्कादायक खुलासा

अनैतिक संबंधातील पतीचा अडसर केला दूर

गडचिरोली : जिल्ह्यातल्या कोरची तालुक्यातील दवंडी या गावात दोन दिवसांपूर्वी रात्री घरात शिरून चाकूने वार करत झालेल्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत इसमाची पत्नी आणि तिच्या प्रियकरानेच कट रचत दुसऱ्या एका इसमाच्या मदतीने ती हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. संशय येऊ नये म्हणून पत्नीने दिशाभूल करत आरोपींचे वेगळेच वर्णन केले होते. त्यातून ही हत्या नक्षलवाद्यांनी तर केली नाही ना, असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण अवघ्या दोन दिवसात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून पत्नीसह इतर दोन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

अन् पोलिसांचा संशय खरा निघाला 

छोटेखानी किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आणि कोणाशीही शत्रुत्व नसणाऱ्या लखन सुन्हेर सोनार (३८) या इसमाची त्याच्याच घरात शिरून चाकूने वार करून हत्या कशी झाली याचे आश्चर्य गावकऱ्यांना वाटत होते. या घटनेची साक्षीदार असलेल्या मृत लखनच्या पत्नीने ज्या पद्धतीने या घटनेचे वर्णन सांगितले तेव्हाच पोलिसांना तिच्यावर संशय येत होता. पण खात्री करण्यासाठी बेडगावचे प्रभारी पोउपनि विठ्ठल सुर्यवंशी यांनी आपली यंत्रणा कामाला लावून गावातून गुप्त माहिती काढली. त्यात तिचे गावातील सुभाष हरिराम नंदेश्वर याच्यासोबत अनैतिक संबंध होते आणि त्यातून पती-पत्नीत नेहमी भांडण होत होते, अशी माहिती मिळाली. त्यातून पोलिसांनी खात्री पटली. त्यांनी शुक्रवारच्या रात्रीच तिला ताब्यात घेऊन बोलते केल्यानंतर तिने हा सर्व कट आणि घटनाक्रम पोलिसांपुढे कथन केला.

पतीचा काटा दूर कर, पत्नीची प्रियकराला गळ

मृत लखन हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करत होता व तिचा शारीरिक, मानसिक छळ करीत होता. या त्रासामुळे ती प्रियकर सुभाष नंदेश्वर याला सर्व हकिकत सांगत पतीचा काटा काढण्यासाठी तगादा लावत होती. त्यातूनच लखन सोनार याच्या हत्येचा कट रचुन हत्येची जबाबदारी कुकडेल या गावातील बळीराम गावडे याच्यावर देण्यात आली. ठरल्यानंतर बळीराम गावडे याने लखनच्या पत्नीच्या मदतीने तिच्या घरात प्रवेश केला आणि धारदार शस्त्राने लखन सोनार याची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपी सरिता लखन सोनार, प्रियकर सुभाष हरिराम नंदेश्वर आणि हत्येची सुपारी घेणारा बळीराम गावडे यांना अटक केली.

या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस मदत केंद्र बेडगावचे प्रभारी अधिकारी पोउपनि विठ्ठल सुर्यवंशी हे करीत आहेत.