लाडूतुला आणि रक्तदानाने साजरा झाला अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस

सिरोंचातील बस स्थानक चौकात अन्नदान

अहेरी : माजी पालकमंत्री तथा धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अम्ब्रिशराव आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी राजनगरी अहेरी रोषणाई, आतिषबाजी आणि विविध कार्यक्रमांनी दुमदुमून गेली होती. उपविभागातील राजघराण्याशी संबंधित गणमान्य व्यक्ती, स्थानिक व्यापारी संघटना, विविध सामाजिक संस्था, पक्षांचे पदाधिकारी तसेच धर्मराव शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वार्डा-वार्डातील नागरिकांनी पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव केला.

अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भाजपातर्फे गरजू रुग्णांना व प्रसुत मातांना फळ, बिस्कीट वाटप करण्यात आले. अहेरी नगर पंचायतचे भाजप गटाचे नगरसेवक आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दानशूरचा राजा गणेश मंडळाकडून अहेरी येथील दानशूर चौकात “लाडूतुला” करण्यात आली. आझाद चौकात शिव जन्मोत्सव समिती व आझाद गणेश मंडळातर्फे ‘महाराज २०२४’ अशा आकाराचा केक कापून त्यांना वाढदिवसासोबत पुढील वर्षीच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आणि मुलचेरा या तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

सिरोंचा येथे रक्तदान शिबिर व अन्नदान

सिरोंचा येथील क्रीडा संकुलात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर बस स्थानक चौक येथे अन्नदानाचा कार्यक्रम झाला. सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील लोकांनी अन्नदानाचा आस्वाद घेतला. तालुकाध्यक्ष दिलीप सेनिगारपू यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पाडला. यावेळी संदीप राचर्लावार, रंगू बापू, संतोष पडालवार, शंकर नरहरी, कलाम हुसेन, रवि चकिनारपुवार, श्रीधर आनकरी, किरण संगेम, किरण कुलसंगे, रमेश मुंगीवार, सीतापती गट्टू, सतीश गट्टू, जयेंद्र श्रीपती, भास्कर गुडीमेडला, श्रीनाथ राऊत, देवेंद्र रंगू, माधव कासर्लावार, महेश कोलावार व जगदंबा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.