प्रक्षोभक वक्तव्यामुळे अहेरीत तणाव, वक्ते डॅा.खरात व आयोजकांवर गुन्हा

प्रबोधन सोहळ्यादरम्यान केले वक्तव्य

अहेरी : येथील बोधीसत्व बहुद्देशीय सामाजिक विकास मंडळामार्फत आयोजित तीन दिवसीय सामाजिक प्रबोधन सोहळ्यादरम्यान सोमवारी पहिल्याच दिवशी वक्ते डॅा.विलास खरात यांनी केलेल्या वादग्रस्त प्रक्षोभक वक्तव्याने वादंग उठले. खरात यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, ब्राम्हण समाज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी संतप्त नागरिकांनी रात्रीच पोलीस स्टेशन गाठले. अखेर मंगळवारी डॅा.विलास खरात आणि आयोजकांवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 299, 3(5) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी रात्री पोलिसांनी कारवाई केली नसल्याने मंगळवारी हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते नारेबाजी करत पुन्हा राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात गोळा झाले. संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे पोलिसांनी वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.