कोरची : तालुक्यातील शेतकरी आणि पशुपालकांकडून घेतलेली 116 जनावरे कत्तलखान्यात नेण्यासाठी खिरूटोलाच्या जंगलात निगरानीसाठी ठेवलेली असताना कोरची पोलिसांनी त्या जनावरांना जीवदान देत संबंधित आरोपींना अटक केली. त्या जनावरांमध्ये गाय, बैल आणि वासरांचा समावेश आहे. त्यांची किंमत 13 लाख 55 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोरची ठाण्याचे पोलीस शिपाई दिनेश भोसले यांच्या सतर्कतेने ही कारवाई करण्यात आली. कत्तलखान्यात नेण्याच्या तयारीत असलेल्या या जनावरांबद्दलची माहिती त्यांना मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने ही कारवाई केली. यात नागपूर येथील ठोक व्यापारी राजू कुरेशी, हेटाळकसा येथील चिल्लर व्यापारी मदन सहारे, विलास गायकवाड आणि रामदास केवळराम सहारे रा.खिरुटोला यांना ताब्यात घेण्यात आले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
खिरुटोला जंगल परिसरात या गोवंशीय जातीच्या प्राण्यांना क्रुरतेने कोंबुन चारापाणी न देता आखुड दोरीने दावणीला बांधुन ठेवले होते. त्यामुळे सर्व आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक बुंदे करीत आहेत.