भामरागड तालुक्यात आठवडाभरात नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकाची हत्या

पोलीस खबरी असल्याच्या संशयातून मारले

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू असताना आणखी एका इसमाची नक्षलवाद्यांनी हत्या केली. भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा या गावातील लालू मालू धुर्वा यांचा मृतदेह बुधवारी सकाळी गावाजवळ आढळला. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली. माडिया भाषेत त्यावर मजकूर लिहिलेला असल्याचे समजते. पोलीस खबरी असल्याचा संशयातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

नक्षलवाद्यांनी मंगळवारच्या रात्रीच त्या इसमाला सोबत नेले आणि बुधवारी पहाटे त्याचा मृतदेह गावाजवळ टाकल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे 26 जुलै रोजी पहाटे अशाच पद्धतीने एका आत्मसमर्पित नक्षलवाद्याची पोलीस खबरी म्हणून काम करत असल्याच्या संशयातून हत्या झाली होती. दोन्ही हत्या भामरागड तालुक्यातील आहेत. 28 जुलै ते 3 आॅगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताह साजरा केला जातो. यावेळी नक्षलवाद्यांना कुठे बॅनरबाजी करण्याची संधी मिळाली नसली तरी आठवडाभरात दोन हत्या करून त्यांनी आपले अस्तित्व दाखविले आहे.