ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरीत 4 ला भव्य नेत्र तपासणी शिबिर

'मावा स्वास्थ्य मावा अधिकार' उपक्रम

अहेरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच अहेरी राजनगरीत भव्य प्रमाणात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 4 ऑगस्ट रोजी अहेरीच्या राजवाडा येथे सदर शिबिर होणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी केले आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रात अतिदुर्गम भाग असल्याने येथील विविध आजारांच्या रुग्णांना जिल्हा मुख्यालय किंवा चंद्रपूर, नागपूरसारख्या शहरात जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारातून ‘मावा स्वास्थ्य मावा अधिकार’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातुन खेड्यापाड्यातील रुग्णांचा शोध घेऊन योग्य औषधोपचार केला जात आहे.

दरम्यान अनेक वयोवृद्ध आणि इतर नागरिकांमध्ये नेत्रदोष, मोतीबिंदू यासारखे आजार दिसून आल्याने या रुग्णांना एकाच दिवशी व एकाच ठिकाणी योग्य उपचार व सल्ला मिळावा या उदात्त हेतूने अहेरी येथील राजवाड्यात येत्या 4 ऑगस्ट रोजी सदर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या शिबिरात नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व मोफत उपचार, तसेच औषधीचे वाटप केले जाणार आहे. डॉ.ध्रुबोज्योती साहा व डॉ.स्नेहा अग्रवाल या तज्ज्ञांकडून रुग्णांची तपासणी व औषधोपचार केले जाणार आहेत. 1 ऑगस्टपासून रुग्णांनी आपल्या नावाची नोंदणी करावी व सदर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी पं.स.सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी केले आहे.