गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी दारू विक्रेत्यांकडून छुप्या मार्गाने शेजारील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारु पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडचिरोली पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवत गोकुळनगरातील दारू विक्रेत्याची दारूने भरलेली दोन वाहने पकडण्यात आली. त्या वाहनांसह एकूण 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेची चमू गस्त करीत असताना दि.12 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीच्या गोकुळनगर परिसरातील दारू विक्रेता आकाश भरडकर हा त्याचा साथीदार रोशन लोखंडे याच्या मदतीने ब्रम्हपुरी (जिल्हा चंद्रपूर) येथून देशी व विदेशी दारु आणून मनोज मुजूमदार व कृष्णा मुजुमदार यांना पुरवठा करणार असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांच्या पथकाने पोरेड्डीवार इंजिनिअरींग कॉलेज, बोदली परिसरात सापळा रचलेला असताना दोन वाहने समोरून येताना दिसताच त्यांना थांबवून तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारुचे 130 खरड्यांचे बॉक्स मिळून आले.
आकाश भाऊराव भरडकर, रा.गोकुळनगर, रोशन हरिदास लोखंडे, रा.उंदरी, ता.उमरेड, जि.नागपूर यांना अटक करून एटापल्ली येथील दारू विक्रेता मनोज मुजुमदार व कृष्णा मुजुमदार, रा.कसनसुर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात अंमलदार प्रशांत गरफडे, नामदेव भटारकर, दीपक लोणारे यांनी ही कारवाई केली.