आकर्षक मानवी साखळीतून विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती आणि शपथग्रहण

400 विद्यार्थ्यांचा सहभाग, पहा झलक

गडचिरोली : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात यावेळीही सर्वाधिक मतदान होण्याचे उद्दीष्ट ठेवून जनजागृतीसाठी नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात दररोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत मंगळवारी (दि.12) कमलताई मुनघाटे हायस्कूलच्या प्रांगणात 400 विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदारांचे लक्ष वेधले. याशिवाय मतदारांना मतदान करण्याची शपथ दिली.

‘स्वीप’अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त डॉ.सचिन मडावी, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे (माध्यमिक) व बाबासाहेब पवार (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, अमरसिंग गेडाम, मुख्याध्यापक स्मीता लडके, शिक्षकवृंद भैसारे, गोरडवार, श्रीमती टप्पो आदींची उपस्थिती होती.

या उपक्रमात गडचिरोली येथील संजीवनी हायस्कूल, नवजीवन हायस्कूल, प्रज्ञा कॅान्व्हेंट, कमलताई मुनघाटे हायस्कूल या शाळेतील प्रत्येकी 100 विद्यार्थी याप्रमाणे एकूण 400 विद्यार्थ्यांनी मतदान करण्याबाबतचे बोटाचे चिन्ह जमिनीवर साकारले, तसेच तिरंगी रंगात सुशोभित केलेल्या गोलाकाराभोवती मानवी साखळी तयार केली.

याप्रसंगी मतदानाचे आवाहन करणाऱ्या घोषणा देऊन उपस्थित मतदारांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. या कार्यक्रमासाठी शिक्षण विभाग, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.