ठाणेगावात पोहोचण्याआधीच एलसीबीच्या पथकाने पकडला १८ लाखांचा सुगंधी तंबाखू

छत्तीसगडमधून केला जात होता पुरवठा

गडचिरोली : राज्यात प्रतिबंधित केलेल्या सु्गंधी तंबाखूची अवैधरित्या छत्तीसगडमधून आयात करून गडचिरोली जिल्ह्यात विक्री करण्याचे केंद्र आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. त्याच ठिकाणी जाणारा १८ लाखांचा सुगंधी तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून दिला. आरमोरी पोलिसांच्या नाकावर टिच्चून केलेल्या या कारवाईनंतर तरी ठाणेगावातील सुगंधी तंबाखू विक्रीचे केंद्र आरमोरी पोलिस बंद करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र मिळणाऱ्या खर्ऱ्यात हा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू वापरला जातो. शेजारील छत्तीसगड राज्यातून मोठया प्रमाणात त्याची आयात केली जाते. त्यावर अंकुश बसावा यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सुगंधीत तंबाखु, अवैध दारु, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार दि.2 रोजी गोपनिय सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणेगाव येथील गंगाधर चिचघरे हा आपल्या साथीदारांच्या मदतीने छत्तीसगड राज्यातून कुरखेडा – वैरागडमार्गे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू आणून चिल्लर तंबाखू विक्रेत्यांना पुरवठा करणार होता. त्यानुसार पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी त्यांच्या नेतृत्वात योग्य ते नियोजन करुन पोलिस पथक वैरागड टी-पार्इंटवर पोहोचले.

वैरागड टी-पॅाईंट चौकात पोलिस पथकातील अंमलदारांनी सापळा रचुन खबरेतील दोन संशयित इसम चारचाकी वाहनाने येत असल्याचे दिसताच तात्पुरता अडथळा निर्माण करुन वाहन थांबवत तपासणी केली. दोन्ही वाहनात एकूण 18 लाख 27 हजार रुपयांचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू होता, तो जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपी गंगाधर भास्कर चिचघरे (39 वर्ष), महेश सुधाकर भुरसे (34 वर्ष), सोमेश्वर भास्कर चिचघरे (36 वर्ष), आणि अमोल अनिल भुरसे (29 वर्ष) सर्व रा.ठाणेगाव यांच्याविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यासाठी त्यांना अन्न व प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक भुसारी यांच्या नेतृत्वात सहा.फौजदार नरेश सहारे, हवालदार अकबरशहा पोयाम, अंमलदार प्रशांत गरफडे, श्रीकृष्ण परचाके, श्रीकांत बोइना, दीपक लोणारे यांनी पार पाडली.