कारगिल चौकातील अतिक्रमणाने घेतला वर्षभरात दुसऱ्या दुचाकीस्वाराचा बळी

नवरदेवाच्या आईच्या मृत्यूने हळहळ

गडचिरोली : शहरातील मूल मार्गावरच्या कारगिल चौकात दिवसेंदिवस वर्दळ वाढत असताना त्या ठिकाणी असलेले अतिक्रमण जीवघेणे ठरत आहे. वर्षभरानंतर गुरूवारी संध्याकाळी पुन्हा एका दुचाकीला या ठिकाणी अपघात होऊन महिलेला प्राण गमवावे लागले. रेखा नामदेव राऊत (44 वर्ष) असे त्या मृत महिलेचे नाव असून ती सावली येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे आपल्या मुलाचे रांगीजवळच्या निमगाव येथे लग्न आटोपून ती परत गावी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे.

कारगील चौक येथे नादुरुस्त ट्रॅक्टरची ट्रॉली पिकअपला बांधून नेली जात असताना त्या पिकअपने दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीचालक बंडू भलवे (27) हा जखमी झाला तर रेखा राऊत ही महिला गंभीर जखमी झाली. तिला दुसऱ्या वाहनाने उपचारासाठी रुग्णालयात आणले, पण डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला.

गेल्यावर्षी 1 मे रोजी कारगिल चौकात एका युवकाला ट्रकने चिरडले होते. या चौकात वाढलेले अतिक्रमण अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. प्रशासनाचे हे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी उदय धकाते यांनी केली आहे.