छत्तीसगड सीमेवर दुसऱ्याही दिवशी चकमक, घातपातासाठी लावलेला भूसुरूंग नष्ट

पोलिसांच्या पवित्र्याने नक्षली मनसुबे ध्वस्त

गडचिरोली : छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या नक्षल चकमकीनंतर सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कुलभट्टी गावाजवळच्या डोंगरावरील नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त केले. त्या ठिकाणी नक्षलवादी तेंदुपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलवून त्यांच्याकडून पैसे उकळणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात सी-60 पथकाने आॅपरेशन राबविले.

यादरम्यान नक्षल्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत पोलिस पथकाने त्यांचा कॅम्प उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे साहित्य, तारा, बॅटरी, सोलर प्लेट्स आणि काही पिशव्या जप्त करण्यात आल्या. सुरक्षा दलांचे नुकसान करण्यासाठी कॅम्पजवळ एक चार्ज केलेला आयईडी (भूसुरूंग) ठेवण्यात आला होता. तो बॅाम्बशोधक-नाशक पथकाने जागेवरच नष्ट केला.

टिपागड आणि कसनसूर दलमचे काही सशस्र नक्षलवादी सावरगाव उपपोलिस स्टेशनअंतर्गत कुलभट्टी गावाजवळच्या डोंगरावर तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील परिसरात शोध घेण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या नेतृत्वात तातडीने C-60 पथकाचे ऑपरेशन सुरू करण्यात आले. संध्याकाळी उशिरा शोध सुरू असताना नक्षलवाद्यांनी पोलिस दलावर गोळीबार सुरू केला, त्याला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी त्या भागातून पळून जाण्यात यशस्वी झाले.

त्यानंतर परिसरात झडती घेण्यात आली. यावेळी घातपात घडविण्यासाठी कॅम्पजवळ एक चार्ज केलेला आयईडी देखील ठेवण्यात आला होता. बॅाम्बशोधक आणि नाशक पथकाला पाचारण करून तो जागेवरच नष्ट करण्यात आला. परिसरात आणखी शोध सुरूच असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.