मान्सूनपूर्व वादळी पावसाने घेतला कुनघाडा, तळोधी परिसरात दोघांचा बळी

वीज कोसळून दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

चामोर्शी : मान्सूनपूर्व वादळी पावसाने गुरूवारी जिल्ह्याच्या काही भागात थैमान घातले. त्यात चामोर्शी तालुक्यातल्या कुनघाडा आणि तळोधी मोकासा परिसरात विजांच्या कडकटासह थोडी गारपीटही झाली. यावेळी वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. याशिवाय दोघे जण जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर वादळामुळे काही घरांचेही नुकसान झाले आहे.

वीज कोसळून मृत्यू झालेल्यांमध्ये गुरूदास मणिराम गेडाम (42) रा.गोवर्धन (कुनघाडा रै) यांचा जागीच, तर वैभव चौधरी यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय नीलकंठ तरकडू भोयर आणि लेकाजी नैताम रा.तळोधी मोकसा हे गंभीरपणे भाजल्या गेले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कुनघाडा रै. परिसरातील कुनघाडा, तळोधी (मोकासा) परिसरात अचानक गुरूवारच्या संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळामुळे राईस मिलसह घरांवरील टिनपत्रे उडून बरेच नुकसान झाले आहे. यावेळी थोडी गारपीट आणि पाऊसही झाला.