गडचिरोली : एका विवाहित महिलेसोबत सूत जुळल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाने तिच्याशी प्रेमविवाह केला. पण अहेरीत राहात असताना सदर उपनिरीक्षकाने दोन स्थानिक इसमांच्या मदतीने पत्नीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याचा आरोप ठेवत त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण सबळ पुराव्याअभावी अहेरी न्यायालयाने त्या उपनिरीक्षकाला खुनाच्या आरोपातून मुक्त केले. मात्र पत्नीच्या साहित्याचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाल्याने त्याला तीन वर्ष सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दरम्यान त्या उपनिरीक्षकाला खुनाच्या आरोपातही शिक्षा व्हावी यासाठी सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
या कहाणीतील मुख्य पात्र हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. न्यायालयीन सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक (तत्कालीन) अविनाश तागड यांचे अहमदनगर येथील आर्मी स्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या एसिंथा सुरेश पिल्ले (33 वर्ष) उर्फ डॅाली या महिलेशी प्रेमसंबंध जुळले. जवळपास 8 वर्ष त्यांचे प्रेमसंबंध सुरू असताना उपनिरीक्षक अविनाश तागड यांची अहेरी येथे बदली झाली. त्यामुळे एसिंथा ही तागड यांच्यासोबत अहेरीला आली आणि त्यांनी गडचिरोलीतील एका मंदिरात लग्न केल्याचे एसिंथाने ठाणे येथे राहात असलेल्या आपल्या बहिणीला कळविले. त्यानंतर 8 आॅगस्ट 2014 रोजी अहमदनगर येथे एसिंथा हिच्या वडीलांनी दोघांनाही आशीर्वाद देऊन रितसर तिला सासरी पाठविले. एसिंथा आपले सर्व सामान पती अविनाश तागड याच्यासोबत अहेरी येथील पोलीस संकुलाशेजारी असलेल्या एका फ्लॅटमध्ये राहायला आली. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना 19 फेब्रुवारी 2015 नंतर एसिंथा हिचा फोन किंवा मॅसेज येणे बंद झाले. तिचा पती (पीएसआय तागड) सुद्धा फोन कॅालला प्रतिसाद देत नसल्याने बहिण ज्युलिएरिटा हिला शंका आली. अधिक चौकशीत पीएसआय तागड याची करमाड पोलीस स्टेशनला बदली झाल्याचे तिला कळले. तेथे जाऊन विचारणा केल्यानंतर, पीएसआय तागड याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिने पोलिसात तक्रार दिली.
अहेरी पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी पीएसआय अविनाश तागड याने 24 फेब्रुवारी 2015 रोजी पत्नीचा खून करून आरोपी सुनील हनमंतू येमुलवार आणि विनोद भुमया जिलेवार (दोघेही रा.अहेरी) यांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी भादंवि कलम 302, 201, 404, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. त्याबाबतचा पुरावा मिळवत दोषारोपपत्र दाखल केले. पण अहेरी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन.बावणकर यांनी सबळ पुरावा नसल्याचे सांगत खुनाच्या आरोपातून तीनही आरोपींना मुक्त केले. मात्र तागड याच्याकडे मृत पत्नीचे साहित्य आढळले. त्यामुळे तिच्या मालमत्तेचा गैरवापर केल्याच्या गुन्ह्यात तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास अहेरीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रमेश धुमाळ यांनी केला. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात जाणार आहे.