देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथील पिंपळगाव घाटातील वैनगंगा नदी पात्रातून रेती तस्करांनी बेसुमार रेतीचा उपसा करून नदीपात्र पोखरून काढले आहे. कोंढाळा येथे तर संपूर्ण घाटात रेतीच शिल्लक उरलेली नाही. रेती तस्कर हे बाहेरचे असल्याची माहिती असून स्थानिक महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय हे सर्व शक्य नाही, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
कोंढाळा गावालगत वैनगंगा नदी १२ महिने वाहात असते. या पात्रातून बेसुमारपणे रेतीची चोरी काही दिवसांपासून सुरू आहे. या नदीघाटाचा लिलाव झालेला नाही. नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने येत असल्याने गावाजवळ नदीपात्र लहान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा केल्याने या ठिकाणी नदीपात्रात आता रेतीचा थरच उरलेला नसल्याचे दिसून येते. असे असताना महसूल प्रशासनाने अजूनपर्यंत मोठी कारवाई केलेली नाही. रेती तस्करांनी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला असला तरी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांपासून तहसील कार्यालयापर्यंत अनेकांचे खिसे गरम झाल्याचे बोलले जाते. गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रावर अधिकाऱ्यांचे येणे-जाणे असते. परंतु कारवाई मात्र होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात निर्माण होईल धोका
नदीपात्रात रेती नसल्याने पावसाळ्यात कोंढाळा गावाला धोका निर्माण होऊ शकतो. नदीकाठावर अनेक शेतकऱ्यांचे मोटारपंप आहेत, पण रेतीच नसेल तर पाणी साचून राहणार का? असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे . कोंढाळा येथील नदीपात्रात रेती तस्करीमुळे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनही सोयीस्करपणे मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येते. प्रशासकीय यंत्रणेच्या आशीर्वादाने रेती तस्करांची कोणी तक्रार केल्यास तक्रारकर्त्याची नावे तस्करांना सांगितली जातात. त्यांच्याशी तस्कर दादागिरी करतात. त्यामुळे आता तक्रार करण्यासाठीही कोणी पुढे येत नाही, अशी गंभीर स्थिती आहे.