हनी ट्रॅप प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळल्या व्हिडिओ क्लिप

पीसीआर वाढविला, तिघांना एमसीआर

गडचिरोली : येथील एका शासकीय अभियंत्यावर मोहिनी घालत नागपुरात हनी ट्रॅपमध्ये अडकवून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींपैकी एका युवतीचा आणि इतर तीन आरोपींचा पीसीआर सोमवारी संपला. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यातील पत्रकार रविकांत याच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ क्लिप आढळल्याने त्याचा पीसीआर पुन्हा दोन दिवस वाढविण्यात आला. तर युवतीसह इतर दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत चंद्रपूर जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांना हवी असलेली हिंगणघाट येथील ‘काजल’ या तरुणीचा शोध लावण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे ती नेमकी कुठे गायब आहे याचे रहस्य वाढले आहे. पोलिस आपल्या मागावर असल्याचे माहित असल्याने ती सराईत गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांना हुलकावणी देत आहे. यावरून ती अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या खेळात सराईत तर नाही ना, किंवा तिला आणखी कोणी मदत तर करत नाही ना, अशीही शंका उपस्थित होत आहे.

दोन वाहनांसह १.३० लाख जप्त

आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी आरोपींकडून काही गोष्टी वदवल्या आहेत. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेले १ लाख ३० हजार रुपयेसुद्धा जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय चारही आरोपींचे मोबाईल पोलिसांनी आधीच जप्त केले आहेत.

…तर होऊ शकतो आणखी काही प्रकरणांचा उलगडा

पोलिसांनी चारही आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली. त्यापैकी आरोपी रविकांत याच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ क्लिप आढळल्या आहेत. त्या नेमक्या कोणाकोणाच्या आहेत हे आरोपींकडून वदवून घेणे पोलिसांसाठी कठीण नसले तरी संबंधित लोकांच्या तक्रारी येणे महत्वाचे आहे. एका अभियंत्याशिवाय आमच्याकडे अद्याप कोणीही तक्रार करण्यासाठी सरसावलेले नसल्याचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांनी सांगितले. अशा प्रकरणात फसवल्या गेलेले कोणी तक्रार करण्यास पुढे आल्यास सदर आरोपींकडून आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पद्धतीने हनी ट्रॅपमध्ये फसवल्या गेलेले इतर लोक गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेरचेही असू शकतात.