गडचिरोली : जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातील महागाव येथे २६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या २० दिवसांच्या कालावधीत शंकर कुंभारे यांच्या कुटुंबाशी निगडीत पाच लोकांचा रहस्यमय मृत्यू झाला. या मृत्यूमागे जादुटोण्यापासून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर पोलिसांनी या रहस्यावरील पडदा दूर करत कुटुंबातीलच दोन महिलांना अटक केली. त्यांनी आपणच त्यांना विष देऊन मारल्याची कबुलीही दिली.
घरातील नवीन सुनेने आणि त्याच कुटुंबाची लेक असलेल्या महिलेने, अशा दोघींनी मिळून अन्न आणि पाण्यातून विष देऊन हे हत्याकांड अतिशय थंड डोक्याने घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्याला त्रास देत असल्याच्या रागातून सुनेने सासू-सासऱ्यांसह पतीला संपविले. तर त्याच घराची लेक असलेल्या महिलेने प्रॅापर्टी हडपण्यासाठी वहिणी आणि आपल्या सख्ख्या भाचीचा काटा दूर केला. दोघींनाही न्यायालयाने १० दिवसांची पोलिस कोठडी दिली असून या प्रकरणात आणखी काही बाहेरील आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
गेल्या २६ आणि २७ सप्टेंबरला महागाव येथील अनुक्रमे शंकर आणि विजया कुंभारे या दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ८ ऑक्टोबरला शंकर कुंभारे यांची विवाहित मुलगी कोमल विनोद दहागावकर (२९ वर्ष, रा.गडअहेरी, ता.अहेरी) यांचा चंद्रपूरला नेताना मृत्यू झाला. यानंतर दि.१४ ऑक्टोबरला मृत विजया कुंभारे यांची बहिण आनंदा उराडे हिचा, तर १५ ऑक्टोबरला शंकर व विजया यांचा मुलगा रोशन याचाही गुढ मृ्त्यू झाला. अशा एकूण पाच जणांच्या मृत्यूमुळे हा काय प्रकार आहे असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. शवविच्छेदन अहवालात मृ्त्यूचे नेमके कारण कळले नसल्यामुळे व्हिसेरा पुढील तपासणीसाठी पाठविला. परंतू अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॅाक्टरांनी व्यक्त केला होता.
दरम्यान रोशनची मामी रोझा रामटेके आणि रोशनची पत्नी संघमित्रा कुंभारे या दोघी सोडून घरातील आणि जवळच्या नातेवाईकांचा अशा पद्धतीने प्रकृती बिघडत मृत्यू झाल्याने पोलिसांचा त्या दोघींवर संशय बळावला. पोलिसांनी त्यांना बोलते केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
कशासाठी घडवून आणले हे हत्याकांड?
या घटनेतील दोन महिला आरोपींनी संगनमताने हे हत्याकांड घडविले. परंतू त्यामागे त्यांचा उद्देश वेगवेगळा होता. रोशनची मामी रोझा हिला भावाच्या ताब्यात असलेल्या प्रॅापर्टीचा मोठा हिस्सा हवा होता. दोन भाऊ आणि चार बहिणींपैकी एका भावाला दुकान दिल्यामुळे त्याचा शेतीत हक्क ठेवला नव्हता. पण एकाच भावाला सर्व जमीन जाऊ नये, ती आपल्याला मिळावी या उद्देशातून तिने त्यात हिस्से पडणाऱ्या सर्वांना संपविण्याचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संघमित्रा आणि रोशन हे पोस्ट आॅफिसमध्ये काम करत होते. त्यांचा डिसेंबर २०२२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. परंतू एप्रिल महिन्यात तिला फेशियल पॅरालिसिस आणि फिट येण्याचा आजार सुरू झाला. त्यामुळे ती त्रस्त झाली होती. मुलीचा हा त्रास आणि तिने केलेल्या प्रेम विवाहामुळे संघमित्राच्या वडिलांनी अकोला येथे एप्रिल महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिला सासू-सासऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात होता. पती रोशन यानेही तिला मारहाण केली होती. त्यातून तिची मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगितले जाते.
इंटरनेटवरून घेतला विषाचा शोध?
मागील दिड महिन्यापासून मोबाईलवरून अशा जहाल विषाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. आधी त्यांनी धोतऱ्याचे विष बोलविले होते. पण ते पाण्यात मिसळल्यानंतर हिरवट रंग येत असल्याने संशय येऊ नये म्हणून त्यांनी दुसरे विष शोधले. त्यानंतर शक्तीशाली मेटल पॅायझन परराज्यातून बोलवण्यात आले. या विषाला रंग, गंध नाही. त्यामुळे ते अन्नात किंवा पाण्यात मिसळून सहजपणे देणे शक्य झाले. सुरूवातीला पोट बिघडून डायरियासारखी लक्षणे दिसतात. त्यानंतर जेव्हा ते विष शरीराच्या पेशींमध्ये पसरते त्यावेळी ते हृदयक्रिया बंद पाडते. तिघांना ते अन्नातून तर दोघांना पाण्यात मिसळून देऊन त्यांची हत्या करण्यात आली.
आणखी तिघांवर केला विषप्रयोग?
रोषणचा मोठा भाऊ जो आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दिल्लीवरून आला होता, आणि रोषणच्या मृत मावशीचा मुलगा या दोघांनाही विषारी पाणी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ते उपचारानंतर बरे झाले. शंकर व विजया यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेताना वाहन चालकाने ते विषयुक्त पाणी पिल्याने त्याचीही प्रकृती बिघडली. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.