गडचिरोलीत शुक्रवारी आदिवासी बचाव कृती समितीचा महाआक्रोश मोर्चा

आदिवासी संघटनांसह समाजबांधव सहभागी होणार

गडचिरोली : आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर जातीचा समावेश न करण्यासह आदिवासी समाजाच्या स्थानिक पातळीवरील आणि राज्यपातळीवरील अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी महाआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. आदिवासी बचाव कृती समिती व सहयोगी विविध आदिवासी संघटनांच्या पुढाकाराने आयोजित या मोर्चाची सुरूवात धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयातून होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर समारोप होणार आहे.

या मोर्चातून काही राज्यस्तरीय मागण्यांसोबत स्थानिक पातळीवरील मागण्यांकडेही लक्ष वेधले जाणार आहे. त्यात गडचिरोली शहरात दिड हजारावर आदिवासी कुटुंब असताना आदिवासी परंपरेनुसार शहरवासियांसाठी दफनभूमी नाही. त्यासाठी स्वतंत्र जागा द्यावी, शेतकऱ्यांना १२ तास वीज द्यावी, वन कुपाची कामे जंगल कामगार संस्थांनाच द्यावी, देसाईगंज कोर्टाच्या समोरील जागा गोटुल समितीने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजूर करावी अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे.

या मोर्चात २५ हजार लोक सहभागी होतील, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष घनश्याम मडावी, सचिव भरत येरमे, माधवराव गावळ, गुलाबराव मडावी, नारी शक्ती संघटनेच्या मनिषा मडावी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.