गडचिरोली : झाडाला गळफास लावून आत्महत्या केलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह शांतीग्राम येथील शेतात आढळला. विशेष म्हणजे त्याचे दोन्ही हात बांधलेले होते. या रहस्यमय मृत्यूने मुलचेरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या नसून त्याची प्रेमप्रकरणातून हत्या करून आत्महत्येचा देखावा रचण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान मुलचेरा पोलिसांपुढे आले आहे.
आकाश अनिल माली (21 वर्ष) असे त्या मृत युवकाचे नाव आहे. गावापासून काही अंतरावर टिकेपल्ली मार्गावर त्याचे शेत आहे. सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेला. मात्र घरी परतला नाही. मंगळवारी पहाटे त्याचे वडील अनिल माली यांनी शेतात जाऊन पाहिले असता अनिलचा मृतदेह शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. यावेळी त्याचे दोन्ही हात मागच्या बाजुला बांधलेल्या अवस्थेत होते.
या घटनेला प्रेमप्रकरणाची किनार असल्याचे सांगितले जाते. संबंधित मुलीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.