गडचिरोली : भरधाव कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात आरमोरी मार्गावरील गोगाव फाट्याच्या समोर मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडला. मयुर विलास भुरसे (25 वर्ष) रा. ठाणेगाव आणि विकास मधुकर धुडसे (26 वर्ष) रा.डोगरसावंगी अशी मृतांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मयुर व त्याचा मित्र विकास हे मयुरच्या दुचाकीने (क्रमांक एम.एच.22, वाय 2513) गडचिरोलीवरून ठाणेगावकडे जात होते. यावेळी भरधाव कारने (क्रमांक एम.एच.22, व्ही 4333) त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही मित्र रस्त्यावर कोसळून त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोघांनीही हेल्मेट घातलेले नव्हते असे कळते.
याप्रकरणी कार्तिक श्रीकृष्ण कुनघाडकर (20 वर्ष), रा.तळोधी मोकासा, ता.चामोर्शी यांच्या तक्रारीवरून कारचालक आशिष माणीक एंचिलवार, रा.देऊळगाव, ता.आरमोरी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते या प्रकरणाची पुढील चौकशी करीत आहे.