हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार व कुष्ठरोग शोध अभियानावर कार्यशाळा

7.71 लाख लोकांना देणार गोळ्या

गडचिरोली : जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम 2025 व कुष्ठरोग शोध अभियान 2025 राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यात हत्तीरोगाने प्रभावीत सात तालुक्यातील 7 लाख 71 हजार 371 लोकांना हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले.

हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम ही गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा, वडसा, आरमोरी व चामोर्शी या सात तालुक्यात राबविण्यात येणार आहे. हत्तीरोग आजार हा जिल्ह्यातील आरोग्याची गंभीर समस्या आहे. या आजारामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व असे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम दिसून येतात. याकरिता शासनाने हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रम सामुदायिक औषधोपचार मोहिमेंतर्गत डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळ्यांसोबतच आयवरमेक्टीन या तीन औषधांचा वयोगट व उंचीनुसार डोस दिला जाणार आहे. याकरिता सात तालुक्यातील 7 लाख 71 हजार 371 लोकसंख्येला हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार (IDA) केला जाणार आहे.

मोहीम कालावधीत गृहभेटीदरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष 2 वर्षापेक्षा कमी वयाची बालके व गरोदर माता, तसेच गंभीर रुग्ण वगळून सर्वाना हत्तीरोग विरोधी गोळ्यांचा डोस दिला जाणार आहे. या मोहिमेत सात तालुक्यातील लाभार्थींनी हत्तीरोग विरोधी गोळ्यांचा डोस घेण्याचे आवाहन, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी केले आहे.

कुष्ठरोग शोध अभियान 2025

कुष्ठरोग शोध अभियान 2025 ही मोहिम दिनांक 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यत येणार आहे. सदर मोहिमेत एकूण 10 लाख 79 हजार 972 एवढ्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी आशा वर्कर व पुरुष स्वयंसेवक यांची टिम तयार करून 31 जानेवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घरोघरी जावून प्रत्यक्ष लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. शोधण्यात आलेल्या संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करुन निदान निश्चित झालेल्या कुष्ठरुग्णांना त्वरित औषधौपचार करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्याकरीता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी केले आहे.