गडचिरोली : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत अवघ्या 24 तासांत दोन युवकांचा एकाच नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत युवक एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली आणि तोडसा या गावातील आहेत. यातील एक युवक मासे पकडण्यासाठी जाळे टाकताना तोल जाऊन पाण्यात पडला होता. बुधवारी त्याच नाल्यात दुसऱ्याही युवकाचा मृतदेह आढळला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली येथील अक्षय कुळयेटी हा सोमवारी रात्रीच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसह डुम्मे नाल्यावर मासे पकडण्यासाठी जाळे टाकण्यास गेला होता. परंतु जाळे टाकताना तोल गेल्याने अक्षय पाण्यात पडला. 9 जुलैला दुपारी 4 वाजताच्या सुमारास घटनास्थळापासून 3 किलोमीटरवरील बंधाऱ्यात अक्षयचा मृतदेह अडकलेला आढळला.
या घटनेनंतर 24 तासांतच तोडसा येथील अमित डोलू तिम्मा या युवकाचा त्याच नाल्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी त्याचा मृतदेह हाती लागला. अमित हा 9 जुलैला सकाळी एटापल्लीला जातो, असे सांगून घरुन निघाला होता. परंतु रात्रीपर्यंत तो घरी परतलाच नाही. बुधवारी सकाळी मरपल्ली येथील नागरिकांना अमितचा मृतदेह डुम्मे नाल्यात आढळला. अमितचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.