देसाईगंज : येथील परसवाणी या व्यापारी कुटुंबाला आणखी एका अपघाताला सामोरे जात दोन जीव गमवावे लागले. कारला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने या कुटुंबातील दोन जण ठार तर तिघे जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बुधवारी पहाटे ब्रह्मपुरीजवळ नागभिड मार्गावर घडला.
दिलीप परसवाणी (55 वर्ष) आणि महेक जितेंद्र परसवाणी (42 वर्ष) या दिर-भावजयींचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमींमध्ये जितेंद्र परसवाणी (45 वर्ष) आणि मुले गौरव व उदय यांचा समावेश आहे. हे कुटुंब पुतणीच्या विवाहासाठी नागपूरला गेले होते. तेथून मध्यरात्री ते परत देसाईगंजला येण्यासाठी निघाले होते. पण पहाटे 5 वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. यात कार रस्त्याच्या कडेला फेकल्या जाऊन कारचा चेंदामेंदा झाला. जखमींवर ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे परसवाणी परिवाराने यापूर्वी दोन अपघातात दोघांचा जीव गमावला आहे. या परिवारावर झालेला हा तिसरा आघात आहे.