गडचिरोली जिल्ह्यात ९५० मतदान केंद्रांसाठी आल्या २६१३ शाईच्या बाटल्या

म्हैसूरच्या कंपनीकडून मतदानासाठी निर्मिती

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्याकरिता शाईच्या 2613 बाटल्या प्राप्त झाल्या आहेत.

जिल्ह्यात आरमोरी , गडचिरोली आणि अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण 950 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी 2 शाईच्या बाटल्या याप्रमाणे एकूण 1900 बाटल्यांची आवश्यकता होती. त्यासोबतच अतिरिक्त 713 मिळून एकूण 2613 शाईच्या बाटल्या जिल्ह्याकरिता मिळाल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो, की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी ही शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलिंग ऑफीसर) मतदाराच्या बोटावर ती शाई लावली आहे की नाही याची तपासणी करतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.