भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकरी, कष्टकरी, ओबीसी समजासाठी भरीव काहीच नाही

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका

गडचिरोली : देशात सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने जनतेत आश्वासनांची खैरात वाटली. मात्र सत्तेवर येताच दिलेली आश्वासने हवेत विरली. गेल्या 10 वर्षात देशात महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड दरवाढ, शेतकरी कष्टकरी कामगार तसेच मागासवर्गात मोडणाऱ्यांची अवहेलनाच करण्यात आली. खोटे बोलून जनतेची लूट करीत व्यापारी हित जोपासणाऱ्या भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या भाजप सरकारचा हिशेब चुकता करा, अशी टीका करीत लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मतदान करून जनहिताच्या प्रश्नांसाठी लढणारे सरकार सत्तेवर आणा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

इंडिया आघाडीप्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, घोट, कोरेगाव (चोप) येथील सभेला ते संबोधित करीत होते. यावेळी मंचावर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान, तसेच आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी तथा मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना.विजय वडेट्टीवार म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकारने देशातील शेतकऱ्यांची फसवणूक केली. खते, औषध यांच्या किमती वाढवल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या लागवडी खर्चात प्रचंड वाढ झाली. उत्पादनाला हमीभाव मिळाला नाही त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातही मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) काहीच योजना नाही. उलट इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना, महिलांना एक लाख रुपये सन्मान निधी, तरुणांना विद्यावेतन आणि शेतकऱ्यांना हमीभाव, असा पंचसूत्री कार्यक्रम राबविण्याचे अभिवचन दिले आहे. सोबतच इंडिया आघाडीचे सरकार आल्यास संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असून कृषीप्रधान देशातील बळीराजाचे हात बळकट करण्याचे काम करणार आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.

भाजपाने याउलट घरगुती सिलिंडरच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ केली होती. आता निवडणुकीच्या तोंडावर थोडी घट केली, पण पुन्हा सत्तेत आल्यास सिलिंडर 600 रुपयांनी महागणार, असेही विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात सर्व तालुक्यात लोडशेडिंग सुरू आहे. नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा पालकमंत्री होणार असे सांगत आहे. 12 तासाचे लोड शेडिंग 24 तासावर नेणार काय? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. नुकतीच सरकारकडून वीज दरवाढ करण्यात आली. जनतेला महागाईच्या खाईत लोटून देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ करणारे हे सरकार नकोसे वाटत आहे. राज्यातील तीन तिघाडा काम बिघाडा सरकारमुळे संपूर्ण राज्य उद्ध्वस्त झाल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.