गडचिरोली : गडचिरोलीकरांचे अनेक वर्षांपासूनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याचे स्वप्न अखेर बुधवारी साकार झाले. यावर्षीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी या महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातूनच तात्पुरत्या स्वरूपात मेडिकल कॅालेजचे कामकाज चालणार आहे, मेडिकल कॅालेजचे पूर्ण सेटअप उभारण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या मागील भागापासून तर जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सलग 82 एकर जागा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती अधिष्ठाता डॅा.अविनाश टेकाडे यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बुधवारी गडचिरोलीसह राज्यातील एकूण 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखली झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्रीगण वेगवेगळ्या ठिकाणावरून दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, खासदार डॅा.एन.डी. किरसान, माजी खासदार अशोक नेते, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, तसेच इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि नागरिक उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, गडचिरोलीसह राज्यात सुरू होत असलेली 10 वैद्यकीय महाविद्यालये स्थानिक व परिसरातील नागरिकांसाठी सेवा केंद्र बनतील. वैद्यकीय महाविद्यालयामुळे युवा वर्गासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या नवीन संधीचे दरवाजे उघडले गेले आहेत. एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासक्रमासाठी मातृभाषेतून पुस्तके उपलब्ध नव्हते. सरकारने हा भेदभाव संपवला आणि महाराष्ट्रातील युवकांना मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल असे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनीही मार्गदर्शन केले.
नियोजन भवनात मार्गदर्शन करताना प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांनी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्ह्यातील व लगतच्या परिसरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे यांनी सांगितले की, चालू सत्रात नीट प्रवेश परिक्षेच्या तिसऱ्या फेरीत गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील. 85 जागा महाराष्ट्रातील रहिवाश्यांसाठी राखीव असतील तर 15 जागा या संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहतील. एम.बी.बी.एस. प्रथम वर्ष अध्यापनासाठी नागपूर व चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांच्या सेवा गडचिरोली येथे वर्ग करण्यात आल्या आहेत.
उत्तम डॉक्टर व आरोग्य व्यवस्था निर्माण व्हावी- खा.डॉ.किरसान
गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम आणि मागास जिल्हा असून जिल्ह्यात आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. अश्या परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होणे आनंदाची बाब आहे, मात्र महाविद्यालयाच्या माध्यमातून उत्तम डॉक्टर निर्माण होऊन आरोग्य व्यवस्था सुद्धा सुधारली पाहिजे, जिल्ह्यातील कोणताही रुग्ण उपचाराकरीता जिल्ह्याबाहेर जाऊ नये, अशी व्यवस्था महाविद्यालय व्यवस्थापकांनी निर्माण करावी, अशा सूचना खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी दिल्या. लवकरात लवकर महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण करून आवश्यकतेनुसार यंत्र सामग्री उपलब्ध करावी, अशीही सूचना त्यांनी केली.
माझ्या राजकीय जीवनातील मोठी उपलब्धी- नेते
आदिवासीबहुल, आकांक्षित, नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज झाले पाहिजे आणि सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा जिल्हावासियांना मिळाव्या यासाठी माझी धडपड होती. अखेर हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी आहे, असे भावोद्गार माजी खासदार आणि भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मा.खा.अशोक नेते यांनी मेडिकल कॅालेजच्या मंजुरीसाठी अशासकीय प्रस्ताव मांडण्यापासून तर केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यापर्यंत केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. केंद्र सरकारने 24 मेडिकल कॉलेजला मंजुरी दिली होती, मात्र त्यात गडचिरोलीचे नाव नव्हते. त्यावेळी मी लोकसभेत तारांकित प्रश्न मांडून (9 डिसेंबर 2022) याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यास आम्ही तातडीने मंजुरी देऊ असे आश्वासन दिले. त्यामुळे केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, आकांक्षित जिल्ह्यात मेडिकल कॉलेज किती महत्वाचे आहे, हे राज्य सरकारच्या निदर्शनास आणुन देत केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली. अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले याचे समाधान आहे. आता गोरगरीब रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी चंद्रपूर किंवा नागपूरला जाण्याची गरज पडणार नाही आणि त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार नाही, असे अशोक नेते म्हणाले.