गडचिरोली : विदर्भवादी विचारसरणीचे नेते व पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांची गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी डॉ.अशोक नेते यांना येत्या दि.12 ऑक्टोबर 2025 रोजी यमुना हॉल, पोटेगाव बायपास, गडचिरोली येथे होणाऱ्या “विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्या”चे निमंत्रण दिले.

याप्रसंगी डॉ.के.के.डोंगरवार यांनी स्वतःच्या हस्ते बनविलेले विशेष ग्रीटिंग कार्ड डॉ.नेते यांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या अनौपचारिक भेटीच्या वेळी सुनील चोखारे, तात्यासाहेब मते, गोवर्धन चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची भावी दिशा, जनभावना आणि क्षेत्राच्या विकासाविषयी विधायक विचारांची देवाणघेवाण झाली. चर्चेदरम्यान मा.खा.डॉ.नेते यांनी विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास, सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी सतत प्रयत्नशील राहणे आणि समाजहित हेच राजकारणाचे खरे उद्दिष्ट आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विधायक संवाद आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे म्हटले. विदर्भाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

































