गडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रशासकीय यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. जिल्हाधिकारी तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन या मतदार संघाच्या तयारीची माहिती दिली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना जिल्हाधिकारी दैने म्हणाले, यापूर्वी एका ईव्हीएमवर (मतदान यंत्रावर) जास्तीत जास्त 16 उमेदवारांची नावे राहू शकत होती. पण त्या जुन्या ईव्हीएम आता बदलल्या असून नवीन मतदान यंत्रावर एकाच मतदार संघात उमेदवारी कायम असलेल्या जास्तीत जास्त 383 उमेदवारांची नावे दिसू शकतील अशी व्यवस्था राहणार आहे.
सध्याच्या यादीनुसार संपूर्ण गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात 16 लाख, 13 हजार 96 मतदार असून त्यात 8 लाख 12 205 पुरूष, तर 7 लाख 99 हजार 409 महिला मतदार आहेत. याशिवाय तृतीयपंथी 12 आणि विदेशात असलेल्या एका मतदाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे येत्या 27 मार्चपर्यंत नवीन मतदारांना आपले नाव यादीत समाविष्ठ करण्याची, नावात किंवा पत्त्यात बदल करण्याची संधी आहे. 1 एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
येत्या 20 मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. तेव्हापासून 27 मार्चपर्यंत उमेदवारांना आपले नामांकन भरता येईल. अॅानलाईन नामांकन भरण्याची सोय आहे, मात्र त्या अर्जाची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात येऊन द्यावी लागणार आहे. त्यानंतरच ते नामांकन अधिकृत समजल्या जाईल. निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यातील अंदाजे साडेचार हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
प्रचारात बालक दिसल्यास होणार गुन्हा
या लोकसभा मतदार संघात 19 एप्रिलला मतदान तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात 14 वर्षाखालील बालक दिसल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कोणत्याही कामासाठी बालकांना ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
95 लाख रुपयांपर्यंत खर्च मर्यादा
उमेदवारांना यावेळी 95 लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे. तथापि त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र खाते उघडून सर्व खर्चाचा हिशेब वेळोवेळी द्यावा द्यावा लागणार आहे. जिल्ह्यात एकूण 948 मतदान केंद्र राहणार आहेत. त्यातील 150 शहरी भागात, तर 798 ग्रामीण भागातील आहेत. 13 केंद्र संवेदनशिल आहेत. (यात पोलिस विभागाच्या यादीतील संवेदनशिल केंद्रांचा समावेश नाही)