गांगलवाडी सबस्टेशनवरून मिळणार आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज

३३ केव्ही केबलचे काम युद्धस्तरावर सुरू

33 केव्ही लाईनच्या कामाची पाहणी करताना आ.कृष्णा गजबे

आरमोरी : शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला पुरेसा वीज पुरवठा देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गांगलवाडी 33 केव्ही सबस्टेशनवरून आरमोरी- देलनवाडी- कढोली सबस्टेशनपर्यंत नवीन 33 केव्ही विद्युत केबल टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. युद्धस्तरावर हे काम सुरु असले तरी हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आ.कृष्णा गजबे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष त्या कामाला पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना आवश्यक त्या प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यात असंतोष खदखदत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता अधिकारी कामात चालढकल तर करीत नाहीत ना? याबाबत खात्री करून घेण्यासाठी आमदार कृष्णा गजबे यांनी स्वत: या कामाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित हा गंभीर प्रश्न यथाशिघ्र मार्गी लावण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

यावेळी प्रत्यक्ष मोक्यावर हजर असलेले आरमोरी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता कृणाल बागुलकर यांनी वीज वाहिनीचे काम प्रगतीपथावर असून शक्य तेवढ्या लवकर वीज उपलब्ध करून देण्याची माहिती आमदार गजबे यांना दिली. त्यामुळे होल्टेजची समस्या दूर होऊन कृषीपंपांना लवकर आवश्यक प्रमाणात वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यावेळी आमदार गजबे यांच्यासोबत भाजपचे जिल्हा सचिव नंदु पेट्टेवार उपस्थित होते.