गडचिरोली : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनासंदर्भातील काही मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेनेच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील ८०० वर कर्मचारी यात सहभागी झाले असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी दिवसभर ठिय्या देऊन निदर्शने केली. हे कामबंद आंदोलन दि.26 पासून 29 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
ग्रामपंचायतींमध्ये सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा कामगारांसह कर वसुली कर्मचारी, लिपीक इत्यादी पदावरील कर्मचारी अत्यल्प वेतनावर काम करतात. याबाबत अनेक वेळा आंदोलन, मोर्चे, अधिवेशन झाले, पण आश्वासनापलिकडे सरकारने काहीही दिले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आता कामबंद आंदोलन सुरू केले.
त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर पालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजुर करावी, निवृत्ती वेतन लागू करावे, वेतन अनुदानासाठी लादलेली वसुलीची अट पूर्णपणे रद्द करावी, आणि सुधारित किमान वेतनातील 10 आॅगस्ट 2020 पासून थकित असलेली फरकाची रक्कम तत्काळ अदा करावी, अशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.