शेतकरी ते ग्राहक थेट विक्री संकल्पना साकारण्यासाठी जिल्हा कृषि महोत्सव

२३ ते २७ आयोजन, २०० स्टॅाल राहणार

गडचिरोली : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल मिळेल त्या किमतीत मध्यस्थामार्फत किंवा व्यापान्यांना विकावा लागतो. तोच माल ग्राहकांना मात्र चढ्‌या दरात खरेदी करावा लागतो. मात्र मध्यस्थ घटकाला वगळून थेट शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना साकारून दोघांचेही हित साधण्यासाठी गडचिरोलीत जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. चंद्रपूर मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात २३ ते २७ जानेवारीदरम्यान हा महोत्सव होणार आहे.

या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन भेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग, माविम, उमेद व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कृषी महोत्सव होणार आहे. या उपक्रमाच्या निमिताने प्रयोगशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून अन्य शेतकन्यांना विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कृषि योजना, उपक्रमांची माहिती, वि‌द्यापीठाचे संशोधित तंत्रज्ञान, बाजारपेठ व्यवस्थापन, शेतीपुरक व्यवसाय आदी विषयांवर चर्चासत्रे आणि तज्ज्ञांचे व्याख्यान होईल. महोत्सवात धान्य, खाद्यपदार्थ, फळे, फुले, भाजीपाला व सेंद्रीय माल विक्रीसाठी उपलब्ध राहील.

महोत्सवात एकूण २०० दालनांचा (स्टॅाल) समावेश राहणार आहे. मंगळवार दि. २३ रोजी, दुपारी १२ वाजता खासदार अशोक नेते यांच्या हस्ते कृषि महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रामदास आंबटकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे यांच्यासह अधिकारीवर्ग राहणार आहे.

बुधवारी खरेदीदार व विक्रेत्यांचे संमेलन, गुरुवारी परिसंवाद, शुक्रवारी रेशीम उद्‌योगावर कार्यशाळा तर शनिवारी शेतकरी सन्मान समारंभ होणार असल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक डॅा.पी.एन.डाखळे यांनी सांगितले.

प्रदर्शनाची वैषिष्ट्ये

कृषि व संलग्न सेवा तंत्रज्ञानावर आधारित परिसंवाद व चर्चासत्रे, विविध पिकांचे दर्शनीय जैव प्रात्यक्षिके, जिल्ह्यातील सेंद्रिय पिक उत्पादने प्रदर्शन व विक्री, सुक्ष्म सिंचन तंत्रज्ञान प्रात्याक्षिके, गौण वनउपज उत्पादने प्रदर्शन व विक्री, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्याने तृणधान्यांची विक्री, खरेदीदार व विक्रेता संमेलन, आधुनिक कृषि यंत्र औजारांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके, जिल्ह्यातील महिला बचत गटांमार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्री.