अहेरी : दर दोन वर्षांनी भरणाऱ्या आणि सर्वात मोठी जत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेलंगणा राज्यातील मेडारम येथील समक्का-सारक्का मातेच्या जत्रेत दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते. माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी राजमाता रुक्मिणीदेवी, युवा नेते अवधेशराव आत्राम यांच्यासह सहपरिवार मेडारम येथे भेट देऊन मातेचे दर्शन घेतले.
तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यातील ताडवाई तालुक्यात मेडारम येथे समक्का-सारक्का मातेचे मंदिर आहे. या ठिकाणी दर दोन वर्षांनी मोठी जत्रा भरते. तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश मधील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. फेब्रुवारी महिन्यात एक आठवडा विशेष पूजा केली जाते. मात्र, जवळपास एक महिना अगोदर आणि एक महिना नंतरही ही जत्रा सुरू असते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि भाविकांच्या सोयीसुविधेसाठी मागील एक महिन्यापासून तेलंगणा प्रशासन या ठिकाणी कामाला लागले आहे.
पुढील काही दिवसात या जत्रेत मोठी गर्दी होणार म्हणून अम्ब्रिशराव आत्राम यांनी त्यापूर्वीच सहपरिवार मेडारम येथे दाखल होऊन समक्का-सारक्का मातेचे दर्शन घेऊन अहेरी विधानसभेसह जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख-शांती, समाधान व उत्तम आरोग्यासाठी मातेकडे प्रार्थना केली.