गडचिरोली : मेरी माटी मेरा देश; अर्थात माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत सर्व गावे, सर्व तालुका आणि जिल्हा मुख्यालयी अमृत कलश यात्रा काढली जात आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अमृत कलशासह सायकल आणि बाईक रॅली काढली. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सायकलवर स्वार होऊन या यात्रेचे नेतृत्व केले.
इंदिरा गांधी चौक ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणापर्यंत ही अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनीसुद्धा सायकल चालवत त्यांची साथ दिली. रॅलीमध्ये जि.प.चे सर्व खाते प्रमुख आणि कर्मचारी सायकल आणि बाईकवर सहभागी झाले होते. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र कणसे यांनी अमृत कलश हाती घेतला होता.
या सायकल रॅलीमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजकुमार निकम यांच्यासोबत शाळेच्या मुला-मुलींनी सुद्धा उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. त्यांच्या देशभक्तीपर जयघोषाने आसमंत दणाणला. सदर रॅलीचा समारोपीय कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन रविंद्र कणसे व प्रशांत कारमोरे यांनी केले.