गडचिरोली : गेल्या 21 ऑक्टोबर रोजी गडचिरोली शहराजवळच्या खरपुंडी ते आकरटोलीकडे जाणाऱ्या मार्गावर एक दिवसाचे नवजात बाळ आढळले होते. ते बालक ज्यांचे कुणाचे असेल त्यांनी येत्या 15 दिवसात संपर्क न केल्यास पुढे त्यांचा त्या बाळावर हक्क राहणार नाही. नंतर ते बाळ दुसऱ्याला दत्तक दिले जाणार आहे.
गडचिरोली पोलिसांनी त्या बालकाला बालकल्याण समितीकडे सुपूर्द केल्यानंतर समितीने सदर बालकाला लोककल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्थेव्दारा संचालित विशेष दत्तक संस्थेकडे दाखल केले आहे. त्या बालकाच्या जैविक माता-पिता किंवा नातेवाईकांनी बालकाचा ताबा मिळण्यासाठी येत्या 15 दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय, बॅरेक क्रमांक 1, खोली क्रमांक 26 व 27, कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे प्रत्यक्ष किंवा मोबाईल क्रमांक 9403704834, दुरध्वनी क्रमांक 07132-222645 यावर संपर्क साधावा.
जर मुदतीत संपर्क साधला नाही, तर केंद्रिय दत्तक प्रधिकरण (CARA) नवी दिल्ली यांच्या अधिसुचनेनुसार दत्तक प्रक्रियेकरिता सदर बालकास बालकल्याण समिती गडचिरोली यांच्या आदेशान्वये विधीमुक्त करुन सदर बालकाची दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांनी कळविले.