गडचिरोली : राज्यातील विविध क्षेत्रांच्या विकासासाठी असलेल्या महामंडळ, मंडळ आणि समित्यांवर अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या नियुक्त्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या. मुख्यमंत्री सचिवालयाने त्याबाबतची यादी दि.15 ला जारी केली. त्यात महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अरविंद सावकार हे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पहिले अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेने आपले जाळे जिल्हाभर विस्तारले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेसाठी या बँकेने राज्यच नाही तर राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार पटकावले आहेत. सध्या प्रंचित सावकार पोरेड्डीवार हे बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
अरविंद सावकार यांच्या या नियुक्तीमुळे सहकार क्षेत्र अधिक बळकट होण्यास मदत होईल, अशी भावना राज्याच्या सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.