गडचिरोली : निवडणूक आयोगाने अखेर निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आणि आदर्श आचारसंहितेला सुरूवात झाली. येत्या 20 नोव्हेंबरला मतदार होणार असल्यामुळे जेमतेम 35 दिवस उमेदवारांच्या हाती आहेत. मात्र जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या सर्वाधिक हॅाट विधानसभा मतदार संघ असलेल्या अहेरीत निवडणूक आचारसंहिता लागण्याआधीच निवडणुकीचे वातावरण तापले आहे. पुन्हा एकदा काका-पुतण्या एकमेकांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले असल्याने या मतदार संघात भाजपसमोर युतीधर्म पाळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
गेल्या महिनाभरापासून मंत्री धर्मरावबाबा आत्राम अहेरी मतदार संघात ठाण मांडून आहेत. ठिकठिकाणी मेळावे, साहित्य वाटप, उद्घाटन-भूमिपूजन, युवा वर्गाचा पक्षप्रवेश आणि त्यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन करत ‘हवा’ आपलीच आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुसरीकडे त्यांचे पुतणे आणि अहेरीच्या गादीचे वारस अम्ब्रिशराव आत्राम यांनी पक्षाचा विचार न करता स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली. सुरूवातीला जर-तर ची भाषा करणाऱ्या अम्ब्रिशराव यांनी आता उघडपणे रिंगणात उतरण्याचे संकेत दिले. त्यामुळे भाजप युतीधर्म पाळून धर्मरावबाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, की अम्ब्रिशराव यांना छुपा पाठिंबा देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
विशेष म्हणजे काका-पुतण्यांनी जाहीर सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या आहेत. मतदार संघातील विकास कामे, सुरजागड लोहखाणीतील रोजगार यावरून अम्ब्रिशराव आक्रमक झाले, तर दुसरीकडे धर्मरावबाबा यांनी साडेचार वर्ष झोपलेले आता जागे झाले, असे म्हणत अम्ब्रिशराव यांच्या वर्मावर बोट ठेवले.
तिकडे महाविकास आघाडीत अद्याप उमेदवार ठरणे बाकी आहे. त्यामुळे तूर्त काका-पुतण्यातील संभाव्य लढतीची चर्चा या मतदार संघात सुरू आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रमानुसार दि.22 ते 29 ऑक्टोबरदरम्यान संभाव्य उमेदवारांना नामांकन भरता येईल. दि.30 ला नामांकनांची छाननी होईल. पात्र उमेदवारांनी 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. त्याच दिवशी निवडणुकीच्या रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना संध्याकाळपर्यंत चिन्हांचे वाटप होऊन प्रचाराला सुरूवात होईल. 20 नोव्हेंबरला मतदार तर दि.23 ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.