रात्रभरात हजारो लोकांनी घेतली दम्याची औषधी

खासदार-आमदारांसह अनेक नेत्यांची उपस्थिती

देसाईगंज : दरवर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दिल्या जाणाऱ्या वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या दमा औषधी वितरणाला यावर्षी हजारो लोकांनी उपस्थिती लावली. कोरोनामुळे तीन वर्षांनंतर प्रथमच सर्वांसाठी खुल्या केलेल्या या औषधी वितरणाला गुरूवारी संध्याकाळी लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. विशेषतः खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे या स्थानिक लोकप्रतिनिधींसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अशोक उईके, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी यांनी उपस्थित राहून औषधीचाही लाभ घेतला.

ही औषधी सर्वांसाठी उपयोगाची असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांना सुद्धा दिली जाते. या नि:शुल्क दमा औषधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले.

दरवर्षी जवळच्या कोकडी येथे होणारा हा कार्यक्रम यावर्षी देसाईगंजमधील आदर्श महाविद्यालयाच्या पटांगणात झाला. संध्याकाळी ६ पासून सकाळच्या ६ वाजेपर्यंत औषधी वितरणाची व्यवस्था केली होती. पण नागरिकांनी दुपारी ३ वाजतापासून गर्दी केली होती. नागरिकांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, अल्पसंख्यांक आघाडी मोर्चाचे बबलू हुसैनी, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, तालुकाध्यक्ष राजू जेठानी, माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाानी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, महामंत्री वसंत दोनाडकर, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.