मिरवणुकीतील शिवरायांचे अश्वारूढ रुप ठरले गडचिरोलीकरांचे आकर्षण

जिल्हाभर शिवजयंती उत्साहाने साजरी

गडचिरोली : हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात साकारणारे पराक्रमी राजे आणि सुराज्य काय असते हे आचरणातून दाखवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव बुधवारी गडचिरोलीसह जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शहरात रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीत अश्वारूढ शिवरायाचे रूप आकर्षणाचे केंद्र ठरले. ज्या अश्वावर महाराज आरूढ होते तो अश्व पुढील दोन पाय उंचावत असल्याने दृष्य पाहून जणूकाही प्रत्यक्षात शिवराय अवतरल्याचे चित्र नजरेसमोर उभे होत होते.

ढोलताशे, हाती भगवे ध्वज उंचावत सहभागी झालेल्या महिला, आतिषबाजी, सुशोभित मनोरे आणि अश्वारूढ शिवराय अशा देखाव्यासह ही मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने फिरली. रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक सुरू होती.

याचबरोबर इंदिरा गांधी चौकात टायगर ग्रुपकडून यावर्षीही शिवरायांचे उंच फ्लेक्स उभे केले होते. तसेच सुशोभित केलेल्या चबुतऱ्यावर शिवरायांचा सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील पुतळा मांडण्यात आला होता. त्या ठिकाणी आपले फोटो काढून घेण्याचा मोह अनेकांना आवरत नव्हता. या ठिकाणी डीजेच्या तालावर तरुण वर्ग रात्री उशिरापर्यंत थिरकत होता.