गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी काढलेल्या ‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रेने संपूर्ण गडचिरोली शहर शिवमय झाले होते. यावेळी “जय शिवाजी, जय भवानी”च्या जयघोषाने शहर दुमदुमले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीने ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले होते.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेची सुरूवात आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करून व्यक्तिमत्त्व घडवण्याचे आवाहन केले. महाराजांच्या शौर्य व राष्ट्रसेवेच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी योगदान देण्याचा संदेश त्यांनी दिला.
ही पदयात्रा सकाळी 8 वाजता जिल्हा परिषद हायस्कूल, चामोर्शी रोड, गडचिरोली येथून सुरू होऊन शासकीय विश्रामगृहाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. सुमारे 3.5 कि.मी. अंतराच्या या पदयात्रेत तीन हजाराहून अधिक नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती तसेच अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.
या पदयात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित फलक, तैलचित्र, देखावे, पारंपरिक वेशभूषा तसेच ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होता. पदयात्रेदरम्यान पाण्याचे स्टॉल, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण याची प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
‘एकता पार्क’चे लोकार्पण
पदयात्रेची सांगता शासकीय विश्रामगृहासमोरील एकता पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ झाली. त्या ठिकाणी शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना अभिवादन करून नगर परिषदेतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या ‘एकता पार्क’चे लोकार्पण आमदार डॉ.मिलिंद नरोटे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, नाटिका आणि व्याख्याने सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश संग्रामे व अमित पुंडे यांनी केले, तर आभार भास्कर घटाळे यांनी मानले.