जिल्ह्यातील 800 वृद्ध भाविक जाणार शासनाच्या खर्चातून अयोध्येच्या तीर्थयात्रेला

7 ऑक्टोबरला पालकमंत्री दाखविणार झेंडा

गडचिरोली : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून पहिल्या फेरीत 800 भाविक 7 ऑक्टोबर रोजी अयोध्येकरिता रवाना होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वडसा येथे भाविकांच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार नामदेव किरसान, आमदार कृष्णा गजबे, आ.डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय दैने, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दिनांक 7 ला सदर रेल्वे 11 वाजता वडसा स्टेशनवरून निघेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाराणसी येथे पोहोचेल. तिथे विश्वनाथ मंदिर दर्शन आणि वाराणसी दर्शन करून मुक्काम असेल. त्यानंतर 9 तारखेला सकाळी अयोध्या येथे पोहोचेल आणि तिथे श्रीराम मंदिरात दर्शन घेतले जाईल. रात्री परतीचा प्रवास सुरू होईल. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता वडसा स्टेशन येथे भाविक परत येतील. भाविकांसोबत वैद्यकीय चमू आणि समाजकल्याण विभागाचे कर्मचारी राहणार असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी कळविले.