गोंडवाना विद्यापीठाचा उद्या दीक्षांत समारंभ, फडणवीस, मुनगंटीवार यांना डी.लिट्.

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना डावलले?

पत्रपरिषदेत माहिती देताना प्र-कुलगुरू डॅा.श्रीराम कावळे, सोबत कुलसचिव डॅा.अनिल हिरेखण

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा 11 आणि 12 वा दीक्षांत सोहळा तथा विद्यापिठाचा स्थापना दिन सोहळा बुधवार, दि.2 ऑक्टोबरला विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन राहणार आहेत. याशिवाय प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, तसेच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याशिवाय विद्यापीठाच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार आहेत. परंतू राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असलेले धर्मरावबाबा आत्राम यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नसल्यामुळे विद्यापीठातही राजकारण शिरले की काय, अशी चर्चा सुरू आहे.

या दीक्षांत समारंभात महामहीम राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते विविध विषयात गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि आचार्य पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

विद्यापीठाचा 13 वा वर्धापन दिन सोहळा

दीक्षांत समारंभानंतर लगेच विद्यापीठाचा 13 वा वर्धापन दिन समारंभ दुपारी 1 वाजता होणार आहे. राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राहतील. तसेच विशेष अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मिलिंद बाराहाते हे राहणार आहेत.

या वर्धापन दिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट्. ही मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय चंद्रपूर येथील विदर्भ वनवासी कल्याणचे अध्यक्ष डॉ.शरद सालफले यांना ‘जीवनसाधना पुरस्कार 2024’ प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे. सोबतच विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयांच्या विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॅा.श्रीराम कावळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी केले आहे.